बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनी केली -अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार
पनवेल (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी म्हणून गौरविले गेले. बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनीच केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सातारा येथे कै. मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी केले. या कार्यक्रमात मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग आणि मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या भारतीय शिक्षण व्यवस्था आणि बहुजन समाज या व्याख्यानाने गुंफले गेले.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेस दिलेल्या भरघोस देणगीतून त्यांच्या दिवंगत मातोश्री कै. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी अर्थशास्त्र परिषदेमार्फत जे विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यातील व्याख्यानमाला हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम डॉ. मुणगेकर यांच्या व्याख्यानाने सुरू करण्यात आला.
या वेळी डॉ. मुणगेकर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषद माझ्या आईच्या उपक्रम राबवत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून, छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतलेल्या शिक्षणामुळे रामचा रामशेठ झाला, असे प्रतिपादन केले. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील सध्याची स्थिती आणि आव्हानांचे विश्लेषण केले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत करून या व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या.
व्याख्यानमाला समारंभामध्ये एकूण तीन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. त्यात डॉ. अनिलकुमार वावरे आणि डॉ. गौरव पवार यांनी लिहिलेल्या आणि एज्युकेशनल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेल्या ‘इमपॉवरिंग फार्मर्स बाय ट्रान्सफॉर्मिंग एग्रीकल्चर द केव्हीके इफेक्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र’ या ग्रंथाचा समावेश होता, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गटांना कृषी विज्ञान केंद्रांमार्फत जे तंत्रज्ञान व माहिती पुरवून प्रशिक्षण देण्यात आले त्याचा कृषी विकासावर झालेल्या परिणामाचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. सविता मेनकुदळे यांनी लिहिलेल्या ‘हिंदी उपन्या स्वामी चित्रात पर्यावरण’ या पूजा प्रकाशन, कानपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले, तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या धनंजय राव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील बिझनेस इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे कॅ. डॉ. राजशेखर मिलोलो यांनी लिहिलेल्या ‘इंडियन इकॉनोमिक एन्व्हायरमेंट’ या क्रमिक पुस्तकाचेदेखील प्रकाशन या वेळी करण्यात आला.
व्याख्यानमालेस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विकास देशमुख, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन. पवार, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. विलास खंदारे, कार्यवाह खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, कार्याध्यक्ष विकास सुकाळे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अनिलकुमार वावरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. बाळासाहेब पाटील, प्रा. किशोर सुतार, डॉ. सविता वावरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयातील प्राध्यापक, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, आजीव सदस्य, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी व आजीव सदस्य, संशोधक विद्यार्थी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला व ही व्याख्यानमाला अत्यंत उत्साहामध्ये यशस्वी झाली. दरम्यान, शनिवारी झालेल्या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख समवेत होते.


Comments
Post a Comment