“वंदे मातरम्” गीतास १५० वर्षे पूर्ण – राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन
शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी “वंदे मातरम्” या आपल्या राष्ट्रगीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था (NIEPID), प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई येथे विविध सांस्कृतिक, देशभक्तिपर व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हा संपूर्ण उपक्रम डॉ. रवी प्रकाश सिंग, प्रभारी अधिकारी, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था (NIEPID) प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी, त्यांच्या पालक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, व्याख्याते व कर्मचारी वर्ग यांच्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या “वंदे मातरम् १५० वर्षे” या विषयावर आयोजित थेट प्रक्षेपण (Live Streaming) दाखवून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने हे थेट प्रक्षेपण पाहिले व त्यातून देशभक्तीचे, राष्ट्राभिमानाचे संदेश आत्मसात केले.
थेट प्रक्षेपणानंतर, संस्थेच्या परिसरातून उत्सव चौक मेट्रो स्थानकापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये विशेष विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागींच्या हातात “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” या घोषवाक्यांनी सजलेले आकर्षक फलक व पोस्टर होते. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला आणि देशप्रेमाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यानंतर, प्रशिक्षणार्थ्यांसाठी “वंदे मातरम्” या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचा व देशभक्तीचा सुंदर संगम साधत विविध विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारल्या. त्याचबरोबर, “वंदे मातरम्” या विषयावर आधारित ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा (Quiz Competition) देखील आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना डॉ. रवी प्रकाश सिंग, प्रभारी अधिकारी, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था (NIEPID) प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.या सर्व कार्यक्रमांमध्ये बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, तसेच संपूर्ण अध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्सवी रंगत आणली.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन प्रा. ज्योती खरात, व्याख्याता, विशेष शिक्षण विभाग यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.


Comments
Post a Comment