पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) अर्थात बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या संयुक्त उपक्रमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बेंगळुरूच्या जी. इ. एच. रिसर्च या संस्थेचे संस्थापक डॉ. बी. के. सरकार आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबईचे इन चार्ज लायब्रेरियन डॉ. बी. के. मोरे यांच्या सारख्या मान्यवरांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच नवप्रवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. महाविद्यालयातील बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या सदस्य सचिव डॉ. ज्योत्स्ना ठाकूर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या मार्गदर्शन सत्रात डॉ. सरकार यांनी विद्यार्थ्यांना आयपीआर फाईलिंग, पेटंटचे व्यवसायीकरण आणि संबंधित योजना याबाबत प्रेरणादायी शब्दात मार्गदर्शन केले, तर डॉ. बी.के. मोरे यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या.यावेळी महाविद्यालयातील एकूण ४१ पेटंटधारकांना सन्मानित करून त्यांच्या नवप्रवर्तनाचे कौतुक करण्यात आले. ज्यामध्ये बारा मान्यताप्राप्त पेटंट, सहा आंतरराष्ट्रीय, तर सहा राष्ट्रीय पातळीवरील पेटंटचा समावेश आहे. यापैकी 22 पेटंट प्रसिद्ध झालेले असून तीन पेटेंटची नोंदणी झालेली आहे. तर चार विषयांचे कॉपीराइट्स अर्थात स्वामित्व हक्क महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळवले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक नेहा फोपले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक जी. एस. साठे यांनी केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे अध्यक्ष डॉ. बी.डी. आघाव, कला विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. यादव इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला असून, त्यातून बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
Comments
Post a Comment