माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांचे रोखठोक मत
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी हवी असेल तर महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांनी आढावा बैठकीत रोखठोक मत व्यक्त केले.
पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, पण कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत. त्यामुळे उरण मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी लढायचीय आणि जिंकून दाखवायची, ती धमक आपल्यात आहे. तरुणांनी पुढे यावे," असे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तातडीची आढावा बैठक उरण तालुक्यातील खोपटे येथे रविवारी झाली. त्यावेळी महेंद्रशेठ बोलत होते. या आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आता निवडणुका लढण्यासाठी आर्थिक बाब महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने त्याचाही विचार करावा, असेही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
महिला अध्यक्षा रेखाताई घरत म्हणाल्या, "आगामी निवडणुकीत डोळ्यांत तेल घालून काम करावे लागेल. मत चोरीला आळा घालण्यासाठी निवडणूक याद्या तपासा."या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेश कमिटी सरचिटणीस आणि निरीक्षक डॉमनिक डिमेलो, मिलिंद पाडगावकर, डॉ. मनीष पाटील, उरण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विनोद म्हात्रे, अखलाख शिलोत्री, उरण तालुका महिला अध्यक्ष रेखाताई घरत, तसेच तालुक्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment