पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका - आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने इमारती प्रकल्प उभारली मात्र नियोजनाअभावी पाणी पुरवठा करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या कारणाने सिडकोच्या वसाहती भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात योग्य प्रकारे सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी ओसी मंजुरी देऊ नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भात अशीच स्थिती राहिली तर लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना घेऊन सिडको विरोधात तीव्र जनआंदोलन उभारीन असा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात निवेदनही दिले असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “पाणीपुरवठा विभागातील अधिकारी गंभीरतेने काम करत नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या काळातही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी सण-उत्सवाच्या काळात पाणीपुरवठा खंडित होतो, त्यामुळे काही अधिकारी मुद्दामून नागरिकांना अडचणीत टाकत आहेत का, अशी शंका निर्माण झाली आहे.” त्यांनी पुढे म्हटले आहे की, पाण्याचे टँकर वाटप सुद्धा काही अधिकारी मनमानी पद्धतीने करत आहेत. नागरिकांच्या रोषाचा मुख्य भार लोकप्रतिनिधींवर येत असताना सिडको अधिकारी मात्र बेफिकीर वृत्तीने वागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह सिडको विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आमदार ठाकूर यांनी दिला आहे. “सिडकोला ‘शहरांचे शिल्पकार’ म्हणवून घ्यायचे असल्यास नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. 'शहरांचे शिल्पकार' असच अभिमानाने मिरवणाऱ्या सिडकोला त्याच्या अंतर्गत नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करता येत नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे सध्या पनवेल परिसरात सिडको प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष आहे. वेळेवर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन हाच पर्याय उरेल,” असा इशारा आमदार ठाकूर यांनी दिला आहे. “जोपर्यंत पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी, सीसी/ओसी देऊ नयेत, तसेच नवीन भूखंडांचे वाटप थांबवावे,” अशी पुनर्मागणी आमदार ठाकूर यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था स्वयंचलित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली असून, पाणीपुरवठा विभागातील निष्काळजी व बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होईल याची खातरजमा करावी, असेही त्यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे.
सिडको अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अनेक बैठकांद्वारे पनवेल विधानसभा क्षेत्र अंतर्गत सातत्याने होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार सूचित केले आहे व प्रशासनाचा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हंटले आहे कि, यावर्षी अजूनपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनसुध्दा, सर्व धरणे भरली असून देखील पनवेल अंतर्गत खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा अशा ठिकाणी लोकांना तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्याबाबत सिडकोचे अधिकारी काहीही उत्तर देत नाहीत. पाणी टंचाई अभावी पाण्याचे टँकर देताना हे अधिकारी अत्यंत मनमानी पध्दतीने त्याचे वाटप करतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे टँकर दिले जातात असा माझा ठाम आरोप आहे. सिडको प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा सर्व रोष, संताप हे नागरिक लोकप्रतिनिधींवर काढत असतात मात्र सिडकोचे अधिकारी मजा करत असताना लोकांचा विनाकारण रोष लोकप्रतिनिधींवर निघत आहे. त्यातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी लोकांना पाणी टंचाई जाणवत आहे व त्यामुळे नागरिकांमध्ये सिडको विरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. पाणी पुरवठा सुधारण्याकरिता, त्यात वाढ करण्याकरिता तसेच त्यामधील अनियमितता कमी करण्याकरिता मी सिडको प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत परंतू त्यावर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सिडकोविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला सर्व नागरिकांना घेऊन सिडको विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी आणि वेळप्रसंगी सिडको कार्यालयाला टाळे लावायला देखील मागेपुढे पाहणार नाही इतकी लोकभावना तीव्र आहे व त्याची सर्व जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील आणि अशी परिस्थिती उद्भवून नये असे वाटत असेल तर तातडीने याप्रश्नी लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित करा, असा समज वजा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.

Comments
Post a Comment