पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने यंदाच्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल योगिनी वैदू यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका आदर्श शिक्षकाची निवड केली जाते. सन २०२५ - २६ या वर्षासाठी पनवेल तालुक्यातून योगिनी वैदू यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली होती.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या कार्यालयात मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सदर सत्कार सन्मान पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना योगिनी वैदू म्हणाल्या की पनवेल तालुका पत्रकार मंचासारख्या प्रथितयश संस्थेने माझ्या कार्याची आणि त्या अनुषंगाने मिळालेल्या पुरस्काराची दखल घेतली ही खरोखरच खूप अभिमानास्पद बाब आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा पद्धतीने पाठीवर कौतुकाची थाप पडल्यानंतर आपले कार्य अधिक जोमाने करण्याची उर्मी मिळते.
योगिनी वैदू या रायगड जिल्हा परिषदेच्या तळोजे पंचनद येथील शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेसह अनेक सामाजिक संस्थांतून त्या सक्रिय असतात. शाळाबाह्य मुलांकरता राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या चळवळीमध्ये देखील त्या अग्रेसर आहेत. भटक्या व विमुक्त समाजातील लोकांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरता तहहयात झटणारे यल्लाप्पा वैदू यांच्या त्या सुकन्या आहेत. वडिलांच्या पवलावर पाऊल ठेवत समाज उद्धाराकरता योगिनी वैदू यांचे योगदान अतुलनीय आहे.
या छोटेखानी सत्कार समारंभाला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहोकर,राजू गाडे, भरत कुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments
Post a Comment