पनवेलमध्ये एआयचा प्रसार – आमदार प्रशांत ठाकूर यांचे ध्येय;एमकेसीएल प्रादेशिक बैठकीत नव्या संकल्पांचा उच्चार
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आयोजित प्रादेशिक बैठक पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे २०० केंद्रांचे एएलसी समन्वयक सहभागी झाले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण, अनुभवांची देवाणघेवाण तसेच आगामी योजनांवर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली.
भविष्यात पनवेल परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा प्रसार वेगाने करण्याचे ध्येय आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. ११) झालेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्रात मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी आपल्या सादरीकरणातून एआयच्या मदतीने केंद्रांना नवनवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांशी संवाद अधिक प्रभावीपणे साधण्यासाठी, मार्केटिंग अधिक स्मार्ट पद्धतीने राबवण्यासाठी तसेच व्यवसायवृद्धीसाठी एआयचा प्रभावी वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीत शिक्षण, कौशल्यविकास आणि नवे तंत्रज्ञान यांमधील संधींवर भर देण्यात आला. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रांमुळे केंद्रांना भविष्यातील कामकाजाची दिशा लाभेल, असा विश्वास उपस्थित समन्वयकांनी व्यक्त केला. या प्रसंगी एएलसी समन्वयकांचा विशेष गौरव सत्कारही करण्यात आला.
Comments
Post a Comment