लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" जाहीर; मुंबई विद्यापीठाकडून सन्मान
पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय' पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची निवड जाहीर केली आहे. उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे एका विशेष समारंभात होणार आहे. तसे पत्र मुंबई विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. प्रसाद कारंडे यांनी महाविद्यालयाला दिले आहे.
थोर देणगीदार तसेच महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा महाविद्यालयाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या ठिकाणी दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्या अनुषंगाने या महाविद्यालयाने प्रगती साधली. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या परिसरात विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक आणि पालकांची मोठी गैरसोय होती. सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अडचण भासत होती. आदिवासीबहूल परिसरात १९८४ साली स्थापन झालेल्या या विद्यालयाला उंच भरारी देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा विद्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी येथील परिस्थिती बदलवून येथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निश्चय केला. दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची कायम तळमळ राहिली आहे त्यामुळे त्यांनी ताबडतोब कार्यवाही केली आणि प्रत्यक्षात निश्चय पूर्ण करीत मोखाडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य स्वरूपात महाविद्यालयाची इमारत साकारली. आज या ठिकाणी दुर्गम भागातील वाडी वस्तीतील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. त्यानुसार उच्च दर्जाचे शिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला "सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार" जाहीर झाला आणि हि बाब रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयासाठी अभिमानास्पद सन्मानाची आहे.
Comments
Post a Comment