पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात झालेल्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत झालेले चुकीचे गैरसमज, यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक जेष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित दाखवून तालुक्यातील ५० हुन अधिक पत्रकार हे एका छताखाली जमले आणि एक तालुका एकसंघ करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला.
चर्चासत्राच्या सुरुवातीलाच दिवंगत पत्रकार किरण बाथम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर मुंबई येथे पोलीस खात्याकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार विजय कडू, निलेश सोनावणे, संजय कदम, सय्यद अकबर, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आज सुरु असलेल्या पत्रकारितेबाबत पत्रकारांनी चर्चा केली तसेच लवकरच पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार माधव पाटील,विजय कडू, निलेश सोनावणे, सय्यद अकबर, संजय कदम, विवेक पाटील, पत्रकार केवल महाडिक, आप्पासाहेब मगर,राज भंडारी, हरेश साठे, क्षितिज कडू, सुभाष वाघपंजे, शंकर वायदंडे, नितीन जोशी, अनिल कुरघोडे, रवींद्र गायकवाड, दिपक घरत, शैलेश चव्हाण, सुनील पाटील, गणपत वारगडा, लालचंद यादव, गौरव जहांगीरदार, साबीर शेख, आशिष साबळे, सुनील वारगडा, विशाल सावंत, चंद्रकांत शिर्के, राम बोरीले, अण्णासाहेब आहेर, सानिप कलोते, असीम शेख, महिला पत्रकार रुपाली शिंदे, दीपाली पारस्कर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment