आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व २०२५ : के एस ए बार्न्स स्कूलमध्ये वर्ग अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, संवादकौशल्य विकसित करणे आणि नेतृत्वगुणांना चालना देणे या उद्देशाने कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी के एस ए बार्न्स स्कूल पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका दर्शना भोईर, कोमल कोळी, कोशिश फाऊंडेशनचे स्वयंसेवक, शिक्षक उपस्थित होते.
या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी माझं कुटुंब, माझं स्वप्न, माझा पहिला शाळेचा दिवस, शिक्षणाचं महत्त्व, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त भारत अशा विषयांवर आपले विचार प्रभावी पद्धतीने मांडले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आत्मविश्वासाने भाषणं सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. अनेक मुलांनी पहिल्यांदाच व्यासपीठावर उभं राहून बोलण्याचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या उपक्रमाचे आयोजन कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मुख्याध्यापक योगिता चौधरी यांनी सांगितले, "विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून उत्कृष्ट आत्मविश्वास दाखवला. पुढील फेरीसाठी विद्यार्थ्यांनी अजून चांगली तयारी करतील, ही खात्री आहे. या वर्ग अंतर्गत फेरीतील विजेत्या विद्यार्थ्यांची पुढील शाळा अंतर्गत फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. इयत्ता नववी मधील विद्यार्थी अभ्रम अधिकारी म्हणाला कि, "कोशिश फाउंडेशन आणि परेश ठाकूर सरांनी आम्हाला सुंदर असा मंच दिला, याबद्दल मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. या स्पर्धेमुळे मला सर्वांसमोर न घाबरता बोलण्याची संधी मिळाली आणि आता मला पुढच्या फेरीसाठी अजून चांगली तयारी करायची आहे.
Comments
Post a Comment