नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात व व्यापक लोकसहभागातून भव्यतम वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपणाप्रसंगी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून प्राधान्याने देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
सीबीडी बेलापूर मधील पारसिक हिल येथे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरंगी, चिंच, आवळा, जांभूळ, हादगा, बांबू अशा देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास आगाखान एजन्सी फोर हॅबिटॅट इंडिया, जन स्मॉल फायनान्स बॅंक, रोटरी क्लब, महिला बचत गट,केबीपी कॉलेज वाशी, एस के कॉलेज खारघर व एस आय इ एस कॉलेज नेरूळ येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त घणसोली येथे शेतकरी शिक्षण मंडळ शाळेजवळील मोकळया जागेमध्ये तसेच सेंट्रल पार्क, सेक्टर ३ येथे वृक्षारोपण समारंभ अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी नानारंगी फुलांनी सजवलेल्या पालखीत वृक्षरोपे ठेवून वृक्षदिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेत वृक्षसंपदेचे रक्षण करण्याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
नेरूळ विभागात रायन इंटरनॅशनल सेक्टर १९, नेरुळ येथे रस्त्याच्या कडेला आणि डि.वाय.पाटील स्टेडियमसमोरील हरित पट्ट्यामध्ये, वाशी विभागात छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून सागर विहार सेक्टर ८ कडे जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या बाजूला, तुर्भे विभागात नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, सेक्टर १३ सानपाडा, संत शिरोमणी उद्यान, सेक्टर ७ सानपाडा आणि स्वामी मोहनानंद गिरी उद्यान, सेक्टर ४ सानपाडा येथे देशी वृक्षरोपांची लागवड मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहयोगातून करण्यात आली.
अशाच प्रकारे कोपरखैरणे विभागात सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात, ऐरोली विभागात यशवंतराव चव्हाण उद्यानात, दिघा विभागात साने गुरुजी उद्यान आणि संत निरंकारी भवनसमोरील उद्यानात देशी वृक्षरोपांची लागवड नागरिक आणि विद्यार्थी यांच्या उत्साही सहभागातून करण्यात आले . अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने देशी प्रजातीच्या जांभूळ, आंबा, करंज, ताम्हण, कडुनिंब, पेरू, पारिजातक, चाफा, आवळा, फणस, पेरू, लिंब, बकुळ, बहावा, कांचन, अनंत, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणच्या वृक्ष लागवडीमध्ये लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजसेवक, शिखर फाउंडेशन, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, इच्छापूर्ती मंडळ कोपरखैरणे आणि धन निरंकारी संस्था अशा विविध समाजसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार व डॉ.राहुल गेठे, उपायुक्त प्रशासन श्री.शरद पवार, उपायुक्त उद्यान श्री.किसनराव पलांडे, उपायुक्त परिमंडळ-१ श्री.सोमनाथ पोटरे, उपायुक्त परिमंडळ -२ डॉ.कैलास गायकवाड, उपआयुक्त मालमत्ता श्री.भागवत डोईफोडे, उपयुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.अजय गडदे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, एमपीसीबीचे क्षेत्रीय अधिकारी श्री.विशाल मुंढे, कार्यकारी अभियंता श्री.मदन वाघचौडे व श्री,राजेश पवार, उपअभियंता श्री.पंढरीनाथ चवडे, सहाय्यक आयुक्त श्रीम.ऋतुजा गवळी, सहाय्यक उद्यान अधिकारी श्री.भालचंद्र गवळी, उद्यान अधिक्षक श्री विजय कांबळे ,उद्यान अधिक्षक श्री.प्रकाश गिरी, समाजविकास अधिकारी श्री.प्रकाश कांबळे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती.विणा भोगले, सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, उद्यान सहाय्यक, समाजसेवक, समूह संघटक असे महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांच्या एकत्रित सहभागातून महानगरपालिका कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी आयोजित केलेले हे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाले. त्यासोबतच महानगरपालिकेकडून वृक्षरोपे उपलब्ध करून घेऊन विविध सोसायट्या, शिक्षण संस्था, वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, मंडळे, महिला संस्था- मंडळे यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे लक्षात घेत त्यादृष्टीनेही सतर्क राहण्याचे या कार्यक्रमांप्रसंगी सूचित करण्यात आले.
Comments
Post a Comment