सिडको व महानगरपालिकेच्या संबंधीत अधिका-यांची समन्वय बैठक
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिव्यांग व्यक्ती व संस्था यांच्यामार्फत सातत्याने होणा-या मागणीस अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सिडको आणि महानगरपालिका यांच्या संबंधीत अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक घेऊन सध्या दिव्यांग वापरत असलेल्या स्टॉलच्या जागा सिडकोकडून महानगरपालिकेस हस्तांतरित करणेबाबतची कार्यवाही 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश दिले. तसेच दिव्यांगांच्या नवीन स्टॉल करीता सिडकोकडे करण्यात आलेल्या जागांच्या मागणीबाबतची कार्यवाहीदेखील नियोजन करून जलद पूर्ण करावी असेही निर्देशित केले.
याप्रसंगी सिडकोच्या शहर सेवा विभागाचे व्यवस्थापक श्री. गजेंद्र जंगम, सामाजिक सेवा अधिकारी श्रीम. दिपीका घुडे व क्षेत्र अधिकारी श्रीम. दिपाली नायडू तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाचे उप आयुक्त श्री. राजेश कानडे आणि परवाना विभागाचे उप आयुक्त श्री. श्रीराम पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 104 ठिकाणी दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी स्टॉलकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेचीही दिव्यांगांना स्वयंरोजगाराकरिता स्टॉलसाठी जागा उपलब्धता करण्याच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यास अनुसरून या जागा हस्तांतरणाबाबत महानगरपालिकेमार्फत सिडकोशी पत्रव्यवहार सुरु असून सदरची हस्तांतरण प्रक्रिया जलद पूर्ण करून दिव्यांगांना दिलासा देण्याबाबत ठोस कार्यवाही करावी असे स्पष्ट करत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्राधिकरणांच्या संबंधीत अधिका-यांना नियमित समन्वय ठेवून ही हस्तांतरण प्रक्रिया 10 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडे दिव्यांग व्यक्ती / संस्थांकडून होणा-या मागणीनुसार नवीन स्टॉलसाठी सिडकोकडे 175 स्टॉल्सकरिता 22 सुयोग्य भूखंडांची मागणी करण्यात आली असून त्याबाबतही सिडकोतील संबंधित विभागांनी जलद कार्यवाही करावी अशी सूचना आयुक्तांनी केली. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने हे काम जलद मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.
अशाचप्रकारे गटई कामगाराच्या स्टॉलचाही प्रलंबित विषय परस्पर समन्वयाने मार्गी लावण्यासाठी सिडकोच्या वतीने धोरण ठरविण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका दिव्यांगांकरिता विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी देशभरात नावाजली जात आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी स्टॉलकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबतही महानगरपालिका सकारात्मक असून याविषयी अधिक गतीने पाठपुरावा करून सातत्याने आढावा घेत हा विषय मार्गी लावणार असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment