खारघर (प्रतिनिधी)- मार्च २०२० पासून संपूर्ण देशात, राज्यात व आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड-१९ विषाणूने थैमान घातले.
भविष्यात तिसरी लाट येईल की नाही माहीत नाही; परंतु त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेतच.
या कोरोना काळात कोविड बाधित रुग्ण, रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, गर्भवती महिला, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला कमीत कमी वेळेत दवाखान्यात पोचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पूर्ण व्यवस्था असलेली रुग्णवाहिकेची आवश्यकता भासत असून सद्यपरिस्थित आमच्या खारघर शहरात एकही सरकारी रुग्णवाहिका नाही. रुग्णांना गोल्डन अवर मध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. गंभीर परिस्थितीत रुग्णवाहिकेची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ती वेळेवर उपलब्ध होत नाही त्यात खाजगी रुग्णवाहिकेचे दर सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात.या कोरोना काळात सरकारी तसेच खासगी रुग्णवाहिकेने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली.अनेक नातेवाईकांचे मानसिक त्रास सुद्धा यामुळे कमी झाले, परंतु काहींना मात्र रुग्णवाहिका उपलब्ध करताना त्रास झाला हे सुद्धा नाकारता येत नाही.
खारघर शहराला आपल्या महानगरपालिकेकडून लवकरात लवकर अत्याधुनिक रुग्णवाहिका मोफत दरात किंवा रास्त दरात उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून रुग्णांना व आवश्यक व्यक्तींना होणारी गैरसोय टळली जाईल.
अशा प्रकारची मागणी भाजपा खारघर-तळोजा मंडलचे सरचिटणीस मा.श्री दिपक शिंदे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना केली आहे. त्याचबरोबर सदर निवेदनाची प्रत पनवेल महानगरपालिकेतील सभागृहनेते- परेश ठाकूर साहेब,महापौर- डॉ.कविता चौतमोल मॅडम,वैद्यकीय आरोग्य अधिकारी-डॉ.आनंद गोसावी, स्थानिक नगरसेवक- शत्रुघ्न काकडे साहेब,स्थानिक नगरसेवक-रामजी गेला बेरा साहेब,या मान्यवरांनाही देण्यात आली आहे.
संपादक : संदेश सोनमळे ✍️
Comments
Post a Comment