नवी मुंबई : संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी कोव्हीड लसीकरणाव्दारे जास्तीत जास्त नागरिक संरक्षित व्हावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केंद्र संख्येत वाढ करून कोव्हीड लसीकरणाला वेग दिला जात आहे. त्याचप्रमाणे कोणताही सामाजिक घटक दुर्लक्षित राहून लसीपासून वंचित राहू नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. यादृष्टीने क्वारी क्षेत्र, रेडलाईट एरिया याठिकाणी तसेच रस्त्यांवरील निराधार बेघर यांचेही लसीकरण करण्यात येत आहे.
या अनुषंगाने विविध सेवा पुरविताना ज्या व्यक्तींचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींचे (Potential Superspreaders) प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. याकरिता विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत असून आत्त्तापर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मेडीकल स्टोअर्समध्ये काम करणा-या 250 कर्मचा-यांचे तसेच हॉटेल / रेस्टॉरंट याठिकाणी काम करणा-या 827 कर्मचा-यांचे 5 सत्रांमध्ये तसेच सलून / ब्युटी पार्लर मध्ये काम करणा-या 338 व्यक्तींचे 3 सत्रांमध्ये लसीकरण करण्यात आलेले आहे.
अशाचप्रकारे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क येणारा रिक्षा चालक व टॅक्सी चालक हा आणखी एक घटक असून त्यांच्याही लसीकरणाचे विशेष सत्र आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ व वाशी येथील रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नेरुळ येथील मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे 355 व राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे 228 अशा एकूण 583 रिक्षा व टॅक्सी चालकांचे कोव्हीड लसीकरण करण्यात आले. यामध्ये 5 महिला रिक्षा चालकांचाही समावेश होता.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दि.07 जुलै 2021 पर्यंत 5,78,538 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून 1,40,162 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच कोव्हीड लसीचे एकूण 7,18,700 डोस देण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांना घराच्या जवळच सुलभपणे लसीकरण करून घेता यावे याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करीत सध्या 78 केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून 111 केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. कोणत्या केंद्रांवर लसीचे किती डोस उपलब्ध असणार आहेत याची माहिती एक दिवस आधी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप अशा सोशल माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरुपात प्रसिध्दीस दिली जात असून केंद्रांवर लसीकरण सुरु होण्यापूर्वी उपलब्ध लसींची संख्या जाहीर करून टोकन वितरीत करण्यात येत आहेत. टोकन वितरण करताना दिव्यांग व्यक्ती व 70 वर्षावरील नागरिकांना रांग न लावता टोकन वितरीत करण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका लसीकऱण सत्रांचे आयोजन करताना विविध घटकांचा सर्वसमावेशक विचार करीत असून त्यानुसार लसीकरणाची सत्रे आयोजित केली जात आहेत. तरी नागरिकांनी आपला क्रमांक आल्यावर लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे नियमित पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment