सिडको महामंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
खारघर : सिडको महामंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून 2021 रोजी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईच्या भौतिक विकासाकरिता कटिबद्ध असणाऱ्या सिडकोकडून शहरातील पर्यावरणाचे संवर्धन करून, हवामान बदल, तापमान वाढ यांसारख्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक उपक्रमही नियमितपणे राबविण्यात येतात.
या प्रसंगी सिडकोतील श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. नाडगौडा, अतिरिक्त मुख्य अभियंता; श्रीमती प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी; श्री. आशुतोष उईके, अतिरिक्त मुख्य नियोजनकार; श्री. दीपक हरताळकर, अधीक्षक अभियंता; श्री. डी. आर. पाटील, महाव्यवस्थापक, पर्यावरण आणि श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, वनक्षेत्रपाल, पनवेल उपस्थित होते.
वर्तमानात वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविले तर भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, या दृष्टीकोनातून सिडकोतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गोल्फ कोर्स मैदाभोवतीच्या वनक्षेत्रात कडूलिंब, जांभूळ, पिंपळ, वड, गुलमोहर, अशोक, मोह ही रोपे लावण्यात आली. खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे लावण्यात आलेल्या या रोपांमुळे या परिसरातील मुळच्या निसर्गसौंदर्यात भरच पडणार आहे.
यापूर्वी देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळाच्या विकासपूर्व कामांतर्गत गाढी नदीच्या वळवलेल्या प्रवाहाच्या किनाऱ्यालगत व खारघर येथील प्रस्तावित मेट्रो मार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले आहे. भविष्यात देखील निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सिडकोतर्फे अशाच प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment